Indapur MIDC News : इंदापूर तालुक्यातील औद्योगिक विकासाला आज एक ऐतिहासिक दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल 1,000 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे इंदापूरमध्ये नवीन औद्योगिक वसाहतीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला असून, तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिवंगत अजित पवारांचे स्वप्न सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत साकार
इंदापूर तालुक्यासाठी स्वतंत्र आणि भव्य औद्योगिक वसाहत असावी, हे स्वप्न दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिले होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. इंदापूरचे आमदार तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही या प्रकल्पासाठी दिवंगत अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे.
हजारो युवकांना मिळणार रोजगाराच्या संधी
या नवीन ‘एमआयडीसी’मुळे केवळ इंदापूरच नव्हे, तर बारामती आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला मोठी गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हजारो स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ प्राप्त होणार आहे. मोठ्या कंपन्यांनी इंदापूरमध्ये गुंतवणूक केल्यास हा तालुका भविष्यात जिल्ह्याचा औद्योगिक केंद्रबिंदू ठरेल.
इंदापूर ठरणार उद्योगांचे नवीन ‘हब’
रत्नपुरी मळ्यातील ही जमीन मोक्याच्या ठिकाणी असल्याने उद्योगांसाठी ती अत्यंत पोषक ठरणार आहे. औद्योगिक विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने गाठलेला हा एक निर्णायक टप्पा मानला जात आहे. या निर्णयाबद्दल संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, इंदापूर लवकरच नव्या उद्योगांचा केंद्रबिंदू म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.


