Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बालविवाहाला कायद्याने बंदी असताना मंगळवेढ्यातील एका गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह केला होता. दुर्दैवाने चारच महिन्यात या अल्पवयीन मुलीवर जीवन संपवण्याची वेळ आल्याचा संतापजनक प्रकार मंगळवेढ्यात समोर आला आहे.याप्रकरणी आता पोलिसांनी पती सासू-सासरे यांना अटक केली आहे. मात्र, चिमुरडीचा बालविवाह झालाच कसा? या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मंगळवेढा तालुक्यातील बावची व निंबोणी परिसरात एका अल्पवयीन 14 वर्षे मुलीचा बालविवाह झाला. यानंतर चार महिन्यातच अल्पवयीन नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. यातून अल्पवयीन नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. याबाबत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर यामध्ये अल्पवयीन मुलीच्या पती व सासऱ्यास पोलिसांनी अटक केली असून त्यांना सध्या न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिकचा तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व त्यांचे पथक करत आहे. मात्र चार महिन्यापूर्वी या बालविवाहास कोण कोण जबाबदार होते या सर्वांवर तातडीने कारवाई केली तरच असे धक्कादायक प्रकार पुन्हा घडणार नाहीत अशी मागणी होऊ लागली आहे.


