राजगड : राजगड तालुक्यातील घेवंडे येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून शेतीसाठी विद्युत मोटार दुरुस्त करताना शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. निव्ही-घेवंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामाजी भाऊराव गायकवाड (वय ५०) आणि त्यांचे बंधू दत्तात्रय भाऊराव गायकवाड (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी गुंजवणी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात दोन्ही भाऊ शेतीच्या कामासाठी नदीपात्रात पाण्याची विद्युत मोटार पाण्यात सोडण्यासाठी गेले आणि तोल जाऊन मोठा भाऊ दत्तात्रय पाण्यात पडले. त्यांना वाचविण्यासाठी लहान भाऊ दामाजीने पाण्यात उडी घेतली.
परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात पडले आणि बुडाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला कळविण्यात आले. त्यानंतर वेल्हे पोलीस तसेच बचाव पथकातील सदस्य घटनास्थळी दाखल झाले. सुमारे पाच तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर माजी सरपंच दामाजी गायकवाड यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र, त्यांचे बंधू दत्तात्रय गायकवाड यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी सापडला.
एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने घेवंडे गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी सरपंच म्हणून दामाजी गायकवाड यांनी गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या निधनाने परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


