Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर थेट हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांनी मुंडेंच्या जवळच्या व्यक्ती कांचन यांचेही नाव घेतले असून, या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
जरांगे पाटील यांच्या मते, धनंजय मुंडे आणि कांचन यांच्यात २० मिनिटांची गुप्त चर्चा झाली. त्यांनी दोन व्यक्तींना सोबत घेऊन हत्येचा प्रयत्न केला. सुरुवातीला जरांगे यांना बदनाम करण्याचा डाव आखला गेला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर जिवे मारण्याचे ठरले, तेही अयशस्वी ठरले. शेवटी औषध किंवा विष देऊन घातपात करण्याचा प्रयत्न झाला, मात्र जरांगे सावध असल्याने हे सर्व डाव उधळले गेले.
“मराठा समाज शांत राहा, मी जिवंत असताना तुम्हाला कसले टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्ही जे करायचे ते करा. पण मी आहे तोपर्यंत शांत राहा,” असे आवाहन जरांगे यांनी केले. ते पुढे म्हणाले, “माझे हातही खूप लांब आहेत, हे त्यांना आता कळले असेल. मी सतर्क आणि सावध असल्याने हे शक्य झाले. समाजासाठी लढायला मी खंबीर आहे. सुखाचे दिवस लवकरच येतील, फक्त तुम्ही शांत राहा.”
जरांगे यांनी मराठा नेते, ओबीसी नेते आणि सर्व पक्षीयांना सावध राहण्याचे आवाहन केले. “मतभेद असले तरी माझ्यावर आलेली वेळ तुमच्यावरही येऊ शकते. ही घटना गांभीर्याने घ्या. या नीच वृत्तीचा नायनाट करावाच लागेल,” असे ते म्हणाले.
प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली असून, बीडमधील एक पीए यांच्याशी संबंध जोडला जात आहे. सुरुवातीला खोटे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बदनाम करण्याचा प्रयत्न होता, नंतर खून आणि शेवटी विषप्रयोगाचे ठरले. “जनतेच्या कोर्टात खरे काय ते सर्वांना माहीत आहे. पोलिसांनी जे करायचे ते करो, आम्हाला शंका नाही,” असे जरांगे म्हणाले. हे प्रकरण कायदेशीर प्रक्रियेत असल्याने अधिक नावे उघड केली नाहीत, पण बीड आणि जालन्यातील १०० हून अधिक नेते-कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते.


