बदलापूर : बदलापूर नगरपरिषदेत शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा नातेवाईकांना एकाचवेळी उमेदवारी देण्यात आल्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा जोरदारपणे ऐरणीवर आला होता. विरोधकांसह महायुतीतीलच भाजपकडूनही टीका होत असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने याला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
आता एकाच घरातून केवळ दोघांना उमेदवारी देण्याची बंधनकारक अट घालण्यात आली असून, कल्याण-डोंबिवलीसह इतर ठिकाणीही ही धोरण राबवण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पक्षांतरी करून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. स्वतः, पत्नी, मुलगा, सून, जावई अशा गोतावळ्याला संधी मिळवण्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांना आता मर्यादा लागणार आहेत. बदलापूर प्रकरणाने हा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आल्यानंतर शिंदेसेना आणि भाजपने एकत्रितपणे हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.
सहा तिकिटांनी राजकीय वाद
शिवसेना (शिंदे गट) ने बदलापूर नगरपरिषदेत वामन म्हात्रे, त्यांची पत्नी वीणा म्हात्रे, भाऊ तुकाराम म्हात्रे, भावजय उषा म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे अशा सहा नातेवाईकांना उमेदवारी दिली. यापैकी वीणा म्हात्रे यांना नगराध्यक्षपदासाठीही संधी देण्यात आली. २०१५ च्या निवडणुकीतही या कुटुंबातील चार जणांना तिकीट मिळाले होते.
बहुप्रभागीय प्रणालीमुळे एका प्रभागातून तीन-चार उमेदवार निवडले जाऊ शकतात, त्यामुळे स्थानिक नेते आपल्या कुटुंबातील जास्तीत जास्त सदस्यांना उमेदवारी देऊन प्रभागावर पूर्ण ताबा मिळवतात. यामुळे निवडणूक खर्च, नागरी कामे, कंत्राट वाटप आणि टक्केवारीवर नियंत्रण मिळते, असा आरोप होत आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांनीही यावरून शिंदेसेनेला “साहजिक नेपोटिझम”चा आरोप करत टीका केली होती.


