मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तयारीला वेग येत असताना भाजप नेते आणि कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी (५ डिसेंबर) पक्षाच्या वर्षपूर्ती मेळाव्यात खळबळजनक विधान केलं. “भाजप देवाभाऊमय तर आहेच, पण महाराष्ट्रातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात,” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. यावेळी लोढा यांनी BMC मधील महापौरपदावर भाजपचा दावा ठोकला असून, मुंबईला भाजपचं नेतृत्व मिळवण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांची असल्याचं सांगितलं.
मेळाव्यात बोलताना लोढा म्हणाले, “आपण देवाभाऊंची विविध रूपं पाहतोय. त्यांची १०० वेगवेगळी रूपं आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामं केली आहेत. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. मी गेल्या २५ वर्षांपासून त्यांना बघतोय. राजकारण करण्याचं काम त्यांना कधी आवडतं तर कधी नाही. पण आपल्या कुटुंबातील सुखदुःखात ते लगेच तत्पर असतात आणि अडचणी आल्या तर धावून येतात.” फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, लोढा यांच्या या विधानाने पक्षांतर्गत उत्साह वाढला आहे. फडणवीस हे केवळ भाजपचे नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाचे ‘सेनापती’ असल्याचं लोढा यांनी अधोरेखित केलं.
महापौरपदासाठी सर्वांचा वाटा
मुंबई हे आपलं घर आहे, असं सांगत लोढा यांनी BMC निवडणुकीत विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांना व्हिप दिला. “मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर फक्त अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नाही. ती आपलीही आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास आपली कॉलरही टाईट होईल,” असं ते म्हणाले.
अमित साटम यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत लोढा म्हणाले, “अमित साटम तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष झाला तेव्हा फक्त अमित साटम होता. आता १०० दिवसांत तुम्ही आमच्यासाठी वरच्या अमितभाईंसारखे झालात. भाजपात कार्यकर्त्याला तिकीट द्या किंवा नका द्या, पण काम करण्यात आनंद येतो तो वेगळाच असतो.” साटम हे मेहनती आहेत आणि ही त्यांची वैयक्तिक निवडणूक नसून, पक्षासाठीची परिश्रमाची परीक्षा आहे, असंही लोढा यांनी नमूद केलं. “आपली सेना भाजप आहे आणि सेनापती अमित साटम आहेत. महापौर आपला बनवायचा आहे, रिलिजस ड्युटी म्हणून ते पूर्ण करूया,” असा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केलं.


