पुणे : पुण्यातील कुख्यात वनराज आंदेकर हत्येच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर, आंदेकर टोळीने रचलेला रक्तरंजित सूडाचा कट पुणे पोलिसांनी उधळून लावला आहे. या कारवाईमुळे शहरातील टोळीयुद्धाचा संभाव्य भडका टळला असून, कात्रज परिसरात रविवारी मध्यरात्री नियोजित हल्ल्याचा डाव पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे उध्वस्त झाला. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळ्यांमधील वैर गेल्या काही वर्षांपासून धुमसत आहे. २०२३ मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते आणि निखील आखाडे यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये निखीलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गायकवाड टोळी सूडाच्या आगीत जळत होती. त्याचाच परिणाम म्हणून १ सप्टेंबर २०२४ रोजी डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येने पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली होती.
वनराज आंदेकर हत्येचा मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या २३ साथीदारांना मोक्का कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असली, तरी आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठी नवा कट रचला. कात्रज परिसरात गायकवाडच्या मुलावर हल्ला करण्याची योजना आखली गेली. या कटात कृष्णा आंदेकरने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने काळे नावाच्या व्यक्तीला पाच हजार रुपये देऊन आंबेगाव पठार परिसरात रेकी करण्यास पाठवले. ३० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता काळेने गायकवाड टोळीच्या सदस्यांच्या घरांची रेकी करून त्याची माहिती कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली.
कृष्णाने यश पाटील आणि अमन यांच्याशी संपर्क साधून सात ते आठ जणांना पाच शस्त्रांसह हल्ल्यासाठी पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काळेने वारंवार कृष्णाला फोन करून हल्ल्याची तयारी निश्चित केली होती. मात्र, पोलिसांना या कटाची कुणकुण लागली आणि त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून एका संशयिताला ताब्यात घेतले. यामुळे आंदेकर टोळीचा हल्ल्याचा डाव उधळला गेला.
या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एककडे सोपवण्यात आला आहे. आंदेकर टोळी नेमकी कोणाचा “गेम” वाजवणार होती, याचा शोध पोलिस घेत आहेत. वनराज आंदेकर हत्येनंतर पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात तणाव कायम आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप न केला असता, तर पुण्यात पुन्हा एकदा रक्तरंजित टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता होती.


