मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे. आता या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे. आचार्य देवव्रत यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून दोन्ही पक्षांचं विलिनीकरण व्हावं, अशी अजित पवारांची इच्छा होती, असं सांगितलं जात असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंत्री आणि आमदारांचा विलिनीकरणाला विरोध असल्याचं सूत्रांच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची सुप्रिया सुळेंच्या कार्यशैलीवर नाराजी असल्याची माहिती आहे. विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागावा, अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विलिनीकरणाला विरोध
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री यांची भूमिका विलिनीकरणाच्या विरोधात असल्याची माहिती आहे. एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावेत, अशी भूमिका मांडली जात असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेगळी भूमिका घेतली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार प्रामुख्यानं सुप्रिया सुळे यांच्यावर नाराज असल्याचं सूत्रांच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विलिनीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम लागावा, अशी अपेक्षा असल्याचं माहिती सूत्रांच्याकडून देण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. या संदर्भातील पत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्र राज्यपाल आचार्य देवव्रत यांना देण्यात आलं आहे. आता राज्यपाल आचार्य देवव्रत सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाची शपथ 5 वाजता देणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. अजित पवारांचा दहावा होई पर्यंत सुनेत्रा पवार बारामतीमध्येच थांबणार आहेत. सुनेत्रा पवार दुखवटा संपे पर्यत नेते कार्यकर्त्यांना तर भेटणार मात्र कोणतेही हार-तुरे स्वीकारणार नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्राटी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्याकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हायला पाहिजेत अशी भूमिका घेतली होती. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागावा अशी भूमिका घेतली जात असल्याचं दिसून येतंय.


