Devendra Fadnavis On Kumbh Mela 2027: आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 भव्य आणि यशस्वी पार पडावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही ठाम आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आतापर्यंत 6 हजार कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली असून, 20 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थ सुरू होईपर्यंत एकूण 25 हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामांच्या शुभारंभ सोहळ्यात बोलताना फडणवीस म्हणाले, “75 वर्षांनी त्रिखंड योग येत असल्याने हा कुंभ विशेष आहे. प्रयागराजचा कुंभ जगातील सर्वात मोठा होता, आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे तितकाच भव्य कुंभ भरवायचा आहे.” त्यांनी सांगितले की, प्रयागराजला 15 हजार हेक्टर जागा असताना, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे केवळ 500 एकर क्षेत्र आहे, त्यामुळे कमी जागेत अधिक भाविकांची व्यवस्था करावी लागणार आहे. यावेळी पाचपट जास्त भाविक येण्याची अपेक्षा असून, सुरक्षेची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यावर भर दिला जात आहे.
हेही वाचा – ‘जोडीदार मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही…’; शरद पवार यांना लग्नाळू तरुणाचं पत्र
निधीची कमतरता भासू देणार नाही
फडणवीस पुढे म्हणाले, “आम्ही, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवलं आहे की सिंहस्थासाठी निधी कमी पडू देणार नाही. गोदावरी नदी स्वच्छ आणि निर्मळ होणं आमचं प्राधान्य आहे. घाटांचे बांधकाम, जुनी मंदिरे आणि घाटांचा जीर्णोद्धार सुरू आहे. मात्र, या सर्व विकासकामांमुळे नाशिकची सांस्कृतिक ओळख जपली जाईल.” त्यांनी पुढे सांगितले की, दोन रिंग रोड, नवीन एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकाच्या कामांना गती देण्यात आली आहे. तसेच एआय-आधारित सीसीटीव्ही प्रणाली बसवून भाविकांच्या सुरक्षेची अत्याधुनिक व्यवस्था करण्यात येणार आहे.
साधू संतांचे आशीर्वाद हवेत
या सोहळ्यात साधू-संतांना उद्देशून फडणवीस म्हणाले, “आम्ही माणूस आहोत, कुठे चुकलो तर सांगा. तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. काही त्रुटी राहिल्या तर आम्ही त्या सुधारू. कुंभमेळ्याची सर्व कामे पारदर्शकपणे आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय पार पडतील.” त्यांनी सांगितले की, भविष्यातील 25 वर्षांचा विकास लक्षात घेऊन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसराचा आराखडा तयार केला जात आहे. “रामायण काळापासून नाशिकचं धार्मिक महत्त्व आहे, त्यामुळे या भूमीला आध्यात्मिकतेचं केंद्र बनवायचं आहे,” असेही फडणवीस म्हणाले.


