Nirmala Navale: सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आणि तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता असूनही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती कार्याध्यक्षा निर्मला नवले यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून भारतीय जनता पक्षाच्या मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव केला. या निकालानंतर निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
डिजिटल लोकप्रियता विरुद्ध प्रत्यक्ष निकाल
पेशाने इंजिनीअर असलेल्या आणि कारेगावच्या माजी सरपंच म्हणून दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या निर्मला नवले यांच्याकडून राष्ट्रवादीला मोठ्या विजयाची अपेक्षा होती. त्यांच्या रिल्सला आणि व्हिडिओंना मिळणारी लाखो लोकांची पसंती पाहून पक्षाने त्यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली होती. मात्र, पंचायत समितीच्या रिंगणात मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला पसंती दिल्याने नवलेंची ही राजकीय गणिते चुकली आहेत.
“ही लढाई इथे थांबत नाही…”
पराभवाचा धक्का पचवून निर्मला नवले यांनी आपल्या समर्थकांसाठी एक भावूक संदेश लिहिला आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि माझ्यासाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याची मी ऋणी आहे. तुमच्या खंबीर साथीमुळेच मला पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळाली आहे. हा प्रवास इथे संपलेला नाही, तर पुन्हा नव्या जिद्दीने मी तुमच्यासोबत चालत राहीन.” आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला त्यांनी ‘सत्तेचे काय कधी येते कधी जाते…’ हे गाणे लावून राजकारणातील चढ-उतारांवर भाष्य केले आहे.


