जालना: मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जालन्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाल्यांना पाणी आल्याने अनेक ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना जालन्यातील भोकरदन तालुक्यातील हिसोडा गावात घडली. गावात पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा दुरुस्त करण्यासाठी 24 वर्षीय विकी राजू साळवे हा तरुण शुक्रवारी रात्री रोहित्राजवळ तपासणी करत होता. त्यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.
दरम्यान, त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे. घटनेची नोंद पारद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पूरामुळे हाहाकार
मराठवाड्यातील जालना, धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यांसह अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने गावोगावी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांचा संपर्क तुटला आहे. घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू, पाण्यात गेलेली शेती आणि चिखलाने व्यापलेली घरे यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. पूरग्रस्त भागात भीषण परिस्थिती उद्धभवली आहे.


