मुंबई : महायुती सरकारमध्ये अंतर्गत तणाव वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय रद्द केला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळील जागा कमी करून दिलेली होती. मात्र, आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने हा निर्णय उलटवला असून, JDU ला संपूर्ण जागा परत देण्यात आली आहे. यामुळे शिंदे गटातील नेत्यांना धक्का बसला आहे.
बच्चू कडू यांना धक्का
मंत्रालयाजवळील जीवन विमा मार्गावर 909 चौरस फूट जागा JDU साठी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली होती. शिंदे सरकारने त्यातील केवळ 200 चौरस फूट JDU साठी ठेवून उरलेली 709 चौरस फूट प्रहार जनशक्ती कार्यालयाला दिली होती. बच्चू कडू हे शिंदे यांच्या शिवसेना बंडखोरीला पाठिंबा देणारे प्रमुख नेते आहेत. मात्र, आता फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द करून JDU ला पूर्ण जागा परत दिली आहे. हे बदल बिहारमधील निवडणुकीसाठी NDA च्या मित्रपक्ष JDU च्या सोयींसाठी झाल्याचे सांगितले जाते. यामुळे कडू यांना मोठा दणका बसला असून, शिंदे गटात असंतोष वाढला आहे.
शिंदे सरकारच्या योजनांवर फडणवीसांची स्पष्टता
शिंदे यांच्या काळातील योजना बंद पडल्याच्या आरोपांमुळे राजकीय वाद तापला आहे. यामध्ये शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा समावेश आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्टपणे भूमिका मांडली. त्यांनी म्हटले, “कुठल्याही योजनांना बंद करण्याचा आमचा हेतू नाही. सर्व योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यावर आर्थिक भार पडला आहे, तरीही फ्लॅगशिप योजनांना प्राधान्य देण्यात येईल. कोणतीही योजना थांबवली जाणार नाही.” फडणवीस यांच्या या विधानाने शिंदे गटातील नेत्यांना दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
‘माझी शाळा सुंदर शाळा’ योजनेच्या बंदीची चर्चा
शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू झालेली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना’ सुद्धा बंद झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. राज्यातील शाळांचे सर्वांगीण विकास, आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण ही तिची मुख्य उद्दिष्टे होती. 2023 शैक्षणिक वर्षात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर स्पर्धांचे आयोजन करून लाखो रुपयांची पारितोषिके देण्यात आली होती.
मात्र, नव्या सरकारने आर्थिक चणचण असल्याचे कारण देत या योजनेचा निधीपुरवठा बंद केला आहे. विरोधी पक्ष शिवसेना (UBT) ने यावरून फडणवीस सरकारवर हल्ला चढवला असून, “शिंदे यांच्या योजनांना उद्देशपूर्णपणे बंद केले जात आहे,” असा आरोप केला आहे. यापूर्वी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पाने यांसारखे निर्णयही रद्द झाले होते. आनंदाचा शिधानंतर ही योजना बंद झाल्याने शिंदे यांच्या नेत्यकीला प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


