पाटणा: जदयूने मणिपूरमध्ये एनडीएचा पाठिंबा काढून घेण्याचे राज्यपालांना पत्र देणाऱ्या प्रदेशाध्यक्षांनाच नारळ दिला आहे. मणिपूरचे जदयू प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रसिंह यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी बीरेनसिंह यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले होते. २०२२ पासून जेडीयू आणि भाजपची युती होती.
जेडीयूच्या ६ पैकी ५ आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याने मणिपूरमध्ये भाजप सरकारचे संख्याबळ वाढले होते. या आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने तसा भाजप सरकारला काहीही फरक पडणार नव्हता. परंतु, बिहार निवडणूक तोंडावर असल्याने व केंद्रात नितीशकुमारांचा टेकू असल्याने या संबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होणार होता. बिहारमध्ये यावर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशावेळी नितीशकुमार यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय भाजपवर दबावाचे तंत्र वापरण्यासाठी घेतला गेला का अशीही चर्चा सुरू झाली होती.
परंतु, या पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयाला नितीशकुमारांची संमती नव्हती हे आता समोर येत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये नितीशकुमारांच्या जेडीयूचे ५ आमदार भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्याआधी अरुणाचल प्रदेशातही जेडीयूचा एकमेव आमदार भाजपमध्ये गेला होता. मणिपूरमध्ये जेडीयूकडे एकमेव आमदार राहिला होता, तोदेखील आता विरोधी बाकावर बसणार आहे.


