Manoj Jarange on Dhananjay Munde: परळी येथे घेतलेल्या प्रचारसभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा उल्लेख करताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आज आमच्यातील एक माणूस इथे नाही, त्याची कमतरता जाणवते, असे मुंडेंनी भाषणात म्हटल्याचे समोर आल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जरांगे म्हणाले, ‘धनंजय मुंडेंनी अशी भाषणे केली असतील तर त्यांच्यासारखा नीच माणून दुसरा कोणी नाही. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या व्यक्तीची उणीव भासते, असे म्हणणे म्हणजे धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही.
जरांगे पुढे म्हणाले की, ‘अजित पवार यांनी तरी आता डोळे उघडावेत. मुंडेंना किती दिवस पाठीशी घालणार? गरीबांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना सत्ताधारी किती प्रोत्साहन देणार? असा सवालही यावेळी जरांगे यांनी केला. जरांगे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत कराडवरही गंभीर आरोप केले. गुंडगिरी, जमिनी बळकावणे, तरुणांना चुकीच्या प्रवृत्तीकडे ढकलणे, लोकांना ब्लॅकमेल करून सत्ता वाढवणे… अशा अनेक गैरप्रकारांत तो गुंतलेला होता. अशा व्यक्तीवर आधार ठेवून राजकारण उभे करणारे धनंजय मुंडे जनतेसाठी हितकारक असू शकत नाहीत, असे ते म्हणाले.
हेही वाचा – परळीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण; म्हणाले, ‘माझा सहकारी आज…’
दरम्यान, त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही लक्ष्य केले. आता तरी दोन्ही नेत्यांनी डोळे उघडले पाहिजेत. अन्यथा मुंडे यांच्या पापात तुम्हीही सापडाल, असा इशाराही त्यांनी दिला. याचबरोबर, अशा गुंडांना संरक्षण देणारी व्यवस्था लोकशाहीला धक्का देणारी आहे. सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी जरांगेंनी केली.


