Municipal Election: राज्यातील राजकीय वातावरण तापवणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आज मोठा निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक आज राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोग आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका, जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या निवडणुकांना ‘मिनी विधानसभा’ असेही संबोधले जाते, कारण त्याचा थेट परिणाम राज्यातील राजकीय समीकरणांवर आणि शहरी कारभारावर होतो. त्यामुळे या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
29 महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होऊ शकतो. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, अमरावती, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेड-वाघाळा, जळगाव, धुळे, मालेगाव, परभणी, जालना यांसह अनेक महत्त्वाच्या शहरांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Pimpri-Chinchwad: एका दिवसात तब्बल 724 फ्लेक्स, किऑक्स जप्त; महापालिकेकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल
राजकीय हालचालींना वेग
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्यामागे ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न आणि प्रभाग रचनेसंदर्भातील न्यायालयीन अडथळे ही प्रमुख कारणे होती. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेली तिहेरी चाचणी पूर्ण न झाल्याने निवडणुका रखडल्या होत्या. मात्र इम्पिरिकल डेटा संकलन आणि अहवाल सादर झाल्यानंतर हा अडथळा दूर झाला आहे. तसेच प्रभाग रचनेबाबतचे वादही बर्याच अंशी निकाली निघाल्यामुळे आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. आज होणाऱ्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार असून, आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.


