शिरूर: ‘पप्पा, गावाकडे नको… बिबट्या पोरांना खातोय हो…’ एका लहान मुलीचे हे निरागस शब्द आता शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड-जांबुत परिसरातील वस्तुस्थितीचे भयावह चित्र उभे करतात. गेल्या आठवड्यात बिबट्यांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने या भागावर दहशतीचे सावट पसरले आहे. कधी शेतीसाठी ओळखला जाणारा घोड-कुकडी नदीकाठचा हा पट्टा आता लोकांच्या तोंडी ‘बिबट्यांचा शिकार पट्टा’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
दोन आठवड्यात दोन बळी
पिंपरखेड गावातील चिमुकली शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी जांबुत येथील भागुबाई जाधव (वय ५५) या पाडव्याच्या दिवशी पहाटेच बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेल्या. सलग दोन घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्यांच्या दहशतीमुळे गावातील रस्ते संध्याकाळी ओस पडले आहेत. बिबट्याच्या दहशतीने अनेक घरांना कुलूप लागले आहे. शहरात राहणारे लोक यंदा दिवाळीत गावाकडे फिरकलेच नाहीत.
वनविभागावर दबाव वाढला
सततच्या घटनांमुळे वनविभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या भागात रात्रीची गस्त वाढवणे, पिंजरे वाढवणे, बिबट्यांची नसबंदी मोहिम राबवणे, आणि शाळा-शेत मार्गांवर सुरक्षाव्यवस्था करणे अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत. केंद्र सरकारकडे वन्य प्राण्यांबाबतचे कायदे बदलण्याची मागणी देखील झाली आहे, जेणेकरून तातडीने उपाययोजना करता येतील.
या भागातील लोकांसाठी दिवाळीचा उत्सव आता भीतीच्या सावटात गेला आहे. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही दिवाळीचे सण साजरे न करता बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. दिवाळीचा उजेड पसरला असला तरी पिंपरखेड–जांबुत परिसरात अंधार कायम आहे. कारण, गावांची रात्र आजही बिबट्याच्या भीतीने जागी आहे.


