Ambernath Municipal Election 2026: अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्रामामध्ये आता नवीन वळण आले आहे. काँग्रेसचे १० नगरसेवक फोडून बहुमताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी चाणक्य नीती वापरत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेचा दावा ठोकला असून, भाजपची मोठी कोंडी केली आहे.
भाजपची खेळी आणि शिंदेंचा पलटवार
अंबरनाथमध्ये १६ जागा जिंकणाऱ्या भाजपने सुरुवातीला काँग्रेसच्या १० फुटीर नगरसेवकांना आपल्या गोटात खेचले होते. याद्वारे शिवसेनेला (शिंदे गट) सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा मनसुबा होता. मात्र, अंबरनाथ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी तातडीने सूत्रे हलवली. शिवसेनेचे २७ नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक यांची वज्रमूठ बांधून त्यांनी बहुमताचा ३२ चा आकडा गाठला आहे.
भाजपच्या हालचाली लक्षात घेता, शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना ठाण्यातील आनंद आश्रमात एकत्र केले. तेथे झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ नगरसेवकांनी आणि एका अपक्ष उमेदवाराने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला. या पाठिंब्याचे अधिकृत पत्र घेऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केला आहे.
१० नगरसेवक भाजपच्या वाटेवर
दुसरीकडे, काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. १२ पैकी १० नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसच्या स्थानिक अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला सध्यातरी अंबरनाथमध्ये लगाम लागल्याचे दिसत आहे.


