मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीने जोर धरला आहे. सोमवारी धुळ्यात यंदाच्या हिवाळ्यातील राज्यातील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातही थंडीचा कडाका वाढला असून नागपूर ८.५ अंश, गोंदिया ८.२अंश , अमरावती ९.२ अंश व यवतमाळमध्ये १० अंश तापमान नोंदले गेले. थंडीच्या या लाटेमुळे नागरिकांची आता खरी हुडहुडी सुरू झाली आहे.
हवामान विभागाने पूर्व विदर्भातील वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे ८ ते १२ डिसेंबरदरम्यान जळगाव, धुळे, नाशिक, पुणे परिसरात किमान तापमान ८ ते ११ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईतही आजपासून पारा १७ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. सकाळी धुके (हेझ) आणि रात्री निरभ्र आकाशामुळे रेडिएटिव्ह कूलिंगचा परिणाम वाढला आहे.
हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, ११ डिसेंबरपर्यंत देशभरात थंडीची लाट कायम राहील. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, गरम कपडे वापरावेत, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


