पुणे : पुणे शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी गंभीर घटना घडली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका मृणाल कांबळे यांच्या भावावर १४ ते १५ जणांच्या टोळक्याने भररस्त्यात बेदम मारहाण केली. ही घटना पुण्यातील कासेवाडी परिसरात घडली असून राजकीय पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव शंतनू ऊर्फ बापू कांबळे (वय ३०) असून ते नगरसेविका मृणाल कांबळे यांचे बंधू आहेत. महापालिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी फलक लावण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेवाडी-भवानी पेठ प्रभागातून भाजपच्या उमेदवार मृणाल कांबळे विजयी झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते परिसरात आभार प्रदर्शनाचे फलक लावत होते. याचवेळी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येऊन या भागात फलक लावू नयेत, अशी सूचना केली.
या कारणावरून वाद वाढत गेला आणि काही वेळातच १४ ते १५ जणांच्या टोळक्याने शंतनू कांबळे यांच्यावर लाथाबुक्क्यांनी आणि मारहाण करत गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
या प्रकरणी शंतनू कांबळे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी १४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये स्थानिक गुंडांचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यांचा शोध सुरू आहे. भरचौकात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या भावावर हल्ला झाल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


