Pune-Satara Travel : पुणे ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील धोकादायक एस-आकाराचे वळण लवकरच इतिहासजमा होणार असून, येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या बोगद्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या ४५ मिनिटे लागणारा घाटातील प्रवास अवघ्या ७ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
एक बोगदा वाहतुकीसाठी खुला
खंबाटकी घाटात दोन नवीन तीन पदरी बोगदे बांधण्यात येत असून या प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या कामात आता महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. सातारा ते पुणे दिशेने जाणारा एक बोगदा नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, सध्या प्रायोगिक तत्त्वावर हलक्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. बोगद्याच्या उतारावरील पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने जड वाहनांना प्रवेश दिलेला नाही. तरीही या मार्गामुळे प्रवासाचा २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचत आहे.
अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या
खंबाटकी घाट हा पुणे-सातारा महामार्गावरील सर्वात धोकादायक टप्पा मानला जातो. तीव्र चढ-उतार, वळणावळणाचा अरुंद रस्ता आणि एस-आकाराच्या वळणांमुळे येथे अपघातांचे प्रमाण जास्त होते. एखादा अपघात घडला की घाटात तासन्तास वाहतूक कोंडी होते. विशेषतः आठवड्याच्या शेवटी आणि सुट्ट्यांच्या दिवशी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
मार्च २०२६ पर्यंत मुदत
या अपघातांचा धोका आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खंबाटकी घाटात पर्यायी मार्ग म्हणून दोन नवीन बोगदे बांधण्यास मान्यता दिली. फेब्रुवारी २०१९ मध्ये कामाला सुरुवात झाली. मात्र कोविड-१९मुळे काम काही काळ ठप्प झाले आणि त्यामुळे प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
अवघ्या ७ मिनिटांत घाट पार
खंबाटकी घाटातील हा नवा मार्ग सुमारे ६.४६ किलोमीटर लांबीचा आहे. येथे प्रत्येकी तीन पदरी असे दोन दुहेरी बोगदे असून, डावीकडील बोगदा १३०७ मीटर तर उजवीकडील बोगदा १२२४ मीटर लांबीचा आहे. उजव्या बाजूला ९३० मीटर लांबीचा व्हायाडक्ट तर डाव्या बाजूला मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. पुणे बाजूकडील दरी पूल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
या बोगद्यांमुळे खंबाटकी घाट पार करण्यासाठी लागणारा वेळ ४५ मिनिटांवरून थेट ७ मिनिटांवर येणार असून, त्यामुळे वेळेची बचत, इंधनाची बचत आणि अपघातांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. पुणे-सातारा प्रवास आता अधिक सुरक्षित, सुसाट आणि सुखकर होणार आहे.


