पुणे: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए म्हणून कार्यरत असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर गौरींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गर्जे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. रविवारी मध्यरात्री गर्जे यांना अटक करून पोलिसांनी कोठडीत ठेवले. रविवारी मोहोज देवढे येथे गौरींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भावनिक वातावरणात गौरींचे वडील ओक्साबोक्शी रडत न्यायासाठी आक्रोश करताना पाहून उपस्थित सर्वजण हळहळले.
रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, डॉ. गौरी यांच्या वडिलांचा आक्रोश पाहून मन हेलावून गेले. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांमुळे घरात वाद होत होते, हे गंभीर आहे. अनैतिक संबंध ठेवणारी महिला देखील गुन्ह्यात आरोपी केली पाहिजे. ती देखील मोकोट राहता कामा नये, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
रुपाली ठोंबरे यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘घरातील माणसाने आत्महत्या केल्यावर हे कळण्यापेक्षा, आधीच घरातील लोकांनी संवाद, समन्वय असणे फार फार महत्त्वाचे आहे. मुळामध्ये मुलींना सक्षम बनून त्यांची मानसिक स्थिती ही माहेरचे किंवा सासरचे दोघांकडे एक समंजसपणाचे वागणे हे फार महत्त्वाचे आहे. डॉक्टर जरी असली तरी त्या सिच्युएशनला या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये नवऱ्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यावरुन झालेले वाद हे फार महत्त्वाचे आहेत. नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्याचप्रमाणे जिच्या सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे महत्वाचे आहे, अशी भूमिका देखील रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये मांडली आहे.


